पुण्यात पीएमपीएलकडून लॉकडाऊन काळात चालक-वाहकांना पगार देण्यात आला नाही, मात्र आता ठेकेदारांना कोट्यावधी रुपये दिले जात असल्याचा आरोप होतोय. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले. पुण्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही यात हस्तक्षेप करणार का असं विचारल्यावर अजित पवार यांनी संतापून राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते पुणे जिल्हा करोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “पीएमपीएल कंपनी वेगळी आहे. त्यात ६० टक्के पुणे महानगरपालिकेचा हिस्सा, तर ४० टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हिस्सा आहे. दोन्ही पालिकांचे आयुक्त, महापौर आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असे सगळे त्याचे सदस्य आहेत. त्या मंडळातील बरेच सदस्य लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यात एक नगरसेवक देखील निवडून जातो. त्यामुळे दोन्ही पालिकांनी निर्णय घेतला असेल तर ते लोकांनी निवडून दिलेले आहेत. त्यांनाच असा निर्णय का घेतला हा प्रश्न विचारला पाहिजे.”
“राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही”
पालकमंत्री म्हणून तुम्ही भूमिका घेणार का असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी संतापून राज्य सरकार उठसुठ सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू शकत नाही, असं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “जसं केंद्र सरकार केंद्राचे निर्णय घेतं, राज्य सरकार राज्याचे निर्णय घेतं तसंच पीएमपीएल कंपनीबाबत निर्णय दोन्ही पालिकेच्या निवडून गेलेले सदस्यांनी निर्णय घ्यायचा असतो. मला त्याबाबत काहीच माहिती नाही. पुणेकरांनी ज्या लोकांना निवडून दिलंय त्याच लोकांनी पीएमपीएलबाबतचा निर्णय घेतलाय. मी फारतर आयुक्तांना याबाबतची माहिती विचारील,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा : राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”
“…की ढगातच गोळ्या मारायच्या?”
तुमचा पीएमपीएलच्या ठेकेदारांना कोट्यावधी रुपये देण्याच्या निर्णयाला पाठिंबा आहे का? असं विचारलं असता अजित पवार संतापले. ते म्हणाले, “मी निर्णयाला पाठिंबा आहे असं मी म्हटलं का? की ढगातच गोळ्या मारायच्या? मी असं म्हणतो आहे की लोकांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ तिथं आहे. त्यांनी विचारपूर्वक जनतेच्या पै पै पैशाची बचत करून निर्णय घेतला पाहिजे, असं माझं मत आहे. पण नक्की काय निर्णय झाला मला माहिती नाही.”