पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अनेक सुविधांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) होत आहे. मात्र, आधीपासून वापरात असलेली इमारत आणि सुरू असलेल्या सुविधांचे उद्घाटन करण्याचा घाट रुग्णालय प्रशासनाने घातल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या वर्षी उद्घाटन केलेल्या तृतीय पंथीयांसाठीच्या विशेष कक्षाचेही उद्या उद्घाटन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम होत आहे.
ससून रुग्णालयात मागील काही दिवसांपासून रंगसफेदीसह परिसर चकचकीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक सुविधांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याने ही कामे सुरू आहेत. रुग्णालयातील अकरा मजली इमारत करोना संकटाच्या आधीपासून २०२० मध्ये तयार झालेली होती. संसर्ग वाढल्याने त्यावेळी औपचारिक उद्घाटन न करताच तिचा वापर सुरू झाला. आता त्या इमारतीचे उद्घाटन होणार असून, तिच्यासमोर उद्घाटनाची नवीन कोनशिलाही बसविण्यात आली आहे. याचबरोबर ससून रुग्णालयातील पेट स्कॅन सुविधाही मागील वर्षी सुरू करण्यात आली. तिचेही उद्घाटन नव्याने करण्यात येणार आहे.
ससूनमध्ये मागील वर्षी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाले होते. आता या कक्षाचे पुन्हा उद्घाटन केले जाणार असून, ते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुश्रीफ हेही या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आपणच केलेल्या उद्घाटनाला दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याची वेळ रुग्णालय प्रशासनाने मंत्री मुश्रीफ यांच्यावर आणली आहे.
करोना संकटाच्या काळात २०२० मध्ये औपचारिक उद्घाटन न करताच ससूनमधील अकरा मजली इमारतीचा वापर सुरू झाला. त्यामुळे तिचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर इतरही अनेक सुविधांचे उद्घाटन केले जाणार आहे.
-डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय
हेही वाचा : भूखंड खरेदीत गायक सुरेश वाडकर यांची फसवणूक; अजित पवार म्हणाले, “या व्यवहारात…”
एकाही तृतीयपंथीयावर उपचार नाही
ससूनमध्ये मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. हा कक्ष नवीन अकरा मजली इमारतीत सुरू करण्यात आला. या कक्षात मागील सहा महिन्यांत एकाही तृतीयपंथीयावर उपचार झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. असे असतानाही रुग्णालय प्रशासन पुन्हा त्याचे उद्घाटन करीत आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांना बोलावून हा कार्यक्रम आगळावेगळा करण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे.