राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्षांच्या प्रमुखांचे मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या राजकारणाची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे खिल्ली उडवली. शनी मंदिराच्या चौथऱ्यावर गेलेल्या महिलेसंबंधी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेले विधान चुकीचे आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
चिंचवडला एका कार्यक्रमासाठी आलेल्या अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक नाही. तरीही सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे काय चालले आहे. उद्धव ठाकरे म्हणतात पुढचा मुख्यमंत्री आमचाच. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील वाटेल ते बोलत आहेत. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. दुष्काळ, महागाईबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून भलतीच चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी केलेले विधान चुकीचे आहे, असे सांगून ते म्हणाले, आपण २१ व्या शतकात आहोत. महिलांना बरोबरीचा दर्जा, अधिकार द्यावा, अशी मागणी होते आहे. ज्या देशांनी महिलांना संधी दिली त्या देशांनी प्रगती केली. नवीन विचार नक्कीच मांडला पाहिजे. मात्र, जुन्या रुढी परंपरांमध्ये बदल करत असताना समाजाला विश्वासात घ्यायला हवे. दिल्लीतील आमदारांना मिळालेल्या घसघशीत वाढीसंदर्भात ते म्हणाले, एकतर्फी बहुमत मिळाल्यानंतर अशा गोष्टी होतच राहणार. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील वाटचाल यामध्ये कसा फरक होतो, हे जनतेने ओळखावे.
‘राजीनाम्याला विनाकारण प्रसिध्दी’
पुणे महापालिकेचे नगरसेवक विशाल तांबे यांच्या राजीनाम्याच्या विषयाला उगीचच प्रसिध्दी दिली जात आहे. आपण सर्वाशी बोललो असून योग्य त्या सूचना दिल्याने हा विषय संपलेला आहे, असा निर्वाळा अजित पवार यांनी यावेळी दिला.

Story img Loader