पिंपरी-चिंचवड : निसर्गाचे चक्र बदलत असल्याने नागरिकांनी देखील आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा. दारू, सिगरेट, ड्रग्सपासून दूर राहिले पाहिजे. आयुष्य हे तणावमुक्त जगले पाहिजे. दूषित हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड येथील खासगी रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. अजित पवार नागरिकांना संबोधित करत होते.
अजित पवार म्हणाले, सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. तणावमुक्त जीवन आपण जगले पाहिजे. दारू, सिगरेट, ड्रग्सपासून दूर राहील पाहिजे. करोना काळात डॉक्टर आणि आरोग्यसेवेचे महत्व आपल्या सर्वांना कळले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही चांगले काम केले. जम्बो हॉस्पिटल काढली, नागरिकांना लस दिली, बुस्टर डोस दिले, ऑक्सिजन प्लांट उभारले, रुग्णवाहिका दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अशी नैसर्गिक संकटे येत असतात. अजूनही काही देशांमध्ये करोना रुग्ण आढळत आहेत. आपणही काळजी घेतली पाहिजे. जगात माणसाच्या जिवापेक्षा दुसरी गोष्ट असूच शकत नाही. याची जाणीव करोनाने करून दिली, असे अजित पवार नागरिकांना संबोधित करताना म्हणाले.
हेही वाचा – पुणे : कृषी विभागाच्या सर्व बैठकांना आता तृणधान्याचा अल्पोपाहार
पुढे ते म्हणाले की, पैशांपेक्षा आरोग्य महत्वाचे आहे. आरोग्यापेक्षा दुसरे काही महत्वाचे नाही. हा धडा करोनाने आपल्याला सर्वांना दिला आहे. माणूस हा फार शॉर्ट मेमरी असलेला व्यक्ती आहे. माणूस दोन महिन्यांनी सर्व विसरून जातो. या सर्व गोष्टी तेवढ्यापुरत्या लक्षात न ठेवता निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आदिवासी, दुर्लक्षित भागात अजून आरोग्य सेवा म्हणावी तशी पोहचलेली नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – पुणे : संक्रातीला भाज्या कडाडल्या, भोगीसाठी भाज्यांना मागणी; दरात २० ते २५ टक्के वाढ
वाईट सवयी सर्वांनी सोडाव्यात, सकाळी लवकर उठून दिनक्रम सुरू करावा लागेल. निसर्गाचे चक्र बदलले आहे. पाऊस, थंडी उशिरा सुरू होत आहे. उन्हाळा उशिरापर्यंत राहतो. नवीन विषाणू येत आहेत. वातावरणातील बदलांमुळे नागरिक आजारी पडत आहेत. दिल्ली, मुंबई आणि पुण्यात प्रदूषण वाढत आहे. कधी दिल्ली एक नंबरला असते, तर कधी मुंबईत दूषित हवेमुळ आरोग्यावर परिणाम होत आहे. लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर जीवनशैली बदलावी लागेल, असे अजित पवार म्हणाले.