स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जगताप, लांडगे यांनी काय केले?

निवडणुका आल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू होतात. भाजपकडून सध्या एकतर्फी आणि खोटेनाटे आरोप होत आहेत. सातत्याने खोटे आरोप केल्यास ते खरे वाटू शकतात, असे सांगत भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, त्यांनी खुशाल चौकशी करावी आणि सत्य उजेडात आणावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत भाजप सरकारला आव्हान दिले.

पिंपरी पालिकेच्या विविध कामांचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला, तेव्हा सांगवीतील जाहीर सभेत ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादीत असताना लक्ष्मण जगताप, राजेंद्र राजापुरे, माई ढोरे, नवनाथ जगताप, महेश लांडगे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले. तेव्हा त्यांनी काय केले. सत्ता आल्यानंतर भाजपने शहरासाठी काय केले. अनधिकृत बांधकाम, शास्तीकराचा अद्यापही ठोस निर्णय नाही. ‘स्मार्ट सिटी’त संयुक्त प्रस्ताव पाठवण्याची चूक भाजप सरकारने केली. ‘बारामती नको’ असे कोणीतरी म्हणाले. भाजपच्या मुलाखती मूळचे बारामतीचे खासदार अमर साबळे घेत होते. बारामतीचे पवार चालत नाहीत, साबळे कसे चालतात, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

स्थानिक नगरसेवक प्रशांत शितोळे आणि अतुल शितोळे यांच्यातील उमेदवारीचा तिढा मी सोडवणार, जो तोडगा निघेल, तो त्यांनी मान्य करावा, असे ते म्हणाले.

खरे प्रेम काय असते, हे मुलीकडून शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात मुली असल्या पाहिजेत. मला दोन्ही मुलेच आहेत, मुलगी नाही, याची खंत वाटते. मात्र, सुना येतील त्या मुलीसारख्याच असतील.
– अजित पवार

Story img Loader