निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून अजित पवारांचा धडाका
जेमतेम दोन महिन्यांवर महापालिका निवडणुका आल्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांच्या भूमिपूजनांचा आणि उद्घाटनांचा धडाका लावल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. ‘शहरविकास’ हाच मुद्दा घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याची रणनीती आखलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकाच दिवशी बरेच कार्यक्रम उरकण्यात आले. महापालिकेच्या खर्चाने प्रचारकी थाटात झालेल्या या कार्यक्रमांचा फायदा घेत राष्ट्रवादीने निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार वातावरणनिर्मिती केल्याचे दिसून आले.
मंगळवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दिवसभर शहरात असलेले अजित पवार सलग दुसऱ्या दिवशीही शहरात ठाण मांडून होते. बुधवारी सकाळपासून त्यांच्या हस्ते पालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करण्यात आले.
कासारवाडीत मैदानाचे तसेच रस्त्याचे भूमिपूजन, जलतरण तलाव परिसरातील ध्यान केंद्र, बास्केटबॉल, स्केटिंग रिंगच्या कामाचे भूमिपूजन, अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे क्रीडा संकुल उभारणे, मासूळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालयाचे भूमिपूजन, चिंचवड एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलाखाली विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन, आकुर्डीतील शिवछत्रपती बालोद्यानचे उद्घाटन, काळेवाडीत भुयारी मार्गाचे उद्घाटन, रहाटणी-पिंपळे सौदागर येथे उद्यानाचे भूमिपूजन, सांगवीतील श्रीराम मंदिर परिसराचे भूमिपूजन, ढोरेनगर येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन, सांगवीतील जलकुंभाचे उद्घाटन, गवळीनगर येथील उद्यानातील व्यायामशाळेचे उद्घाटन, चऱ्होलीतील जलतरण तलाव, खेळाचे मैदान व व्यायामशाळेचे भूमिपूजन, मोशीतील खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन, शाहूनगरला राजर्षी शाहूमहाराज उड्डाणपुलाचे उद्घाटन, संभाजीनगर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी अजित पवार दिवसभर शहरात होते. याशिवाय, त्यांनी पक्षाचे अन्य कार्यक्रमही केले. सायंकाळी त्यांनी पालिकेच्या स्वरसागर महोत्सवास हजेरी लावली. अजित पवारांनी पिंपरी पालिका ताब्यात राखण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने ते कामाला लागले आहेत. शहरविकास हा राष्ट्रवादीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. त्यामुळेच पालिकेच्या माध्यमातून शहरभरात होणारी विविध कामे राष्ट्रवादीने केली आहेत, हे नागरिकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.