लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: गेल्या आर्थिक वर्षामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी) ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के असून ढोबळ अनुत्पादक कर्जांमध्ये (एनपीए) गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होऊन तो ४.५१ टक्क्यापर्यंत खाली आला आहे, अशी माहिती बँकेचे संचालक आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
पीडीसीसीच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की जिल्हा बँकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटींच्या झाल्या असून गेल्या वर्षभरात ९१ कोटींची वाढ झाली आहे. बँकेने मार्चअखेर ७९७४ कोटी तीन लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. बँकेतील एकूण गुंतवणूक ७७९२ कोटी रुपये असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये ८.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासोबच चालू वर्षी बँकेच्या शाखेमध्येच शेतकऱ्यांना अवघ्या २० रुपयांत ई-सातबारा उतारा देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा… जगभरातील अतिश्रीमंतांचा सोन्याकडे ओढा
पीडीसीसी ही राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. देशात ज्या ५३ शेड्युल बँका आहेत. त्यामध्ये वसूल भाग भांडवल व बँक निधीमध्येही पीडीसीसी अग्रेसर असून बँकेचा प्रोग्रेसिव्ह कव्हरेज रेशिओ ४१२ टक्के आहे. याशिवाय बँकेमार्फत आठ टक्के दराने गृहकर्ज, सहा टक्के दराने शैक्षणिक कर्ज आणि बचत गटांना चार टक्के व्याजदराने वित्तपुरवठा केला जातो. बँकेच्या २९४ शाखा असून गुगल-पे ही सुविधा दिली आहे. बँकेच्या नोकरभरतीबाबत एजन्सी नियुक्त करण्यासाठी सहकार विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करू, असेही पवार यांनी सांगितले.
हेही वाचा… कोंढव्यातील शाळेवर कोणतीही कारवाई नाही; पुणे पोलीस, एनआयएकडून स्पष्टीकरण
मार्केट यार्ड येथील भूविकास बँकेचा ३५ हजार चौरस फुटांचा भूखंड जिल्हा बँकेने २६ कोटी ७१ लाख रुपयांना विकत घेतला आहे. याठिकाणी बँकेचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस आहे. दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने पीडीसीसीकडून कर्ज घेतले आहे. बँकेला या कारखान्याकडून १०० कोटींहून अधिक रक्कम येणे आहे. कर्जाची रक्कम आली नाही, तर संचालक मंडळ नियमानुसार कारवाई करेल, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला.