लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ‘अजित पवार यांना बारामतीमध्ये रस आहे. बारामती त्यांचा डीएनए आहे,’ असे नमूद करून ‘अजित पवारच बारामतीचे उमेदवार असतील,’ असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी दिले. त्याचप्रमाणे, ‘महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या तुलनेत महायुती खूप पुढे गेली असून, जागावाटपाचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल,’ असेही तटकरे यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘व्हीजन महाराष्ट्र २०५०’ या उपक्रमांतर्गत तटकरे बोलत होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, उपाध्यक्ष चंद्रकान्त फुंदे या वेळी उपस्थित होते. ‘रस्ते, पायाभूत सुविधा, बंदरे, जीडीपीबाबत महाराष्ट्र देशातील अन्य राज्यांपेक्षा प्रगत आहे. राज्याच्या विकासात सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्याचा सर्वांगीण आढावा घेऊन पुढील २५ वर्षांचे धोरण मांडतानाच राज्याला विकासाच्या दृष्टीने आणखी प्रगतिपथावर नेण्यासाठी आम्हीच सत्तेत असू,’ असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-उरूळी देवाची, फुरसुंगी गावांवर पुणेकरांचे ५०० कोटी खर्च

‘बारामती मतदारसंघातून मी सात ते आठ वेळा निवडून आलो आहे. बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस नाही,’ असे विधान अजित पवार यांनी नुकतेच केले होते. या दरम्यान, त्यांचे चिरंजीव जय पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याने जय राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार असतील, या चर्चेने जोर धरला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बारामतीमधून अजित पवार यांच्यासह अन्य २५ उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी अजित पवार बारामतीमधूनच निवडणूक लढवतील, याचे सूतोवाच केले.

तटकरे म्हणाले, की महाविकास आघाडीच्या १२५ जागांसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. याचा विचार करता महायुती महाविकास आघाडीपेक्षा खूप पुढे गेली आहे. महायुतीचे जागावाटप सन्मानाने होणार असून, त्याचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.

विकासाचे धोरण राबविताना अजित पवार उपमुख्यमंत्री की मुख्यमंत्री यांपैकी कोणत्या भूमिकेत असतील, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मित्रपक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात नेतृत्वाचा विचार निकालानंतर होतो. अजित पवार यांनी नेतृत्व करावे, ही आमची इच्छा आहे. मात्र, आम्हाला पक्षाच्या मर्यादा माहीत आहेत. पुढील किमान १५ वर्षे मित्रपक्षांचे सरकार असेल. कोणत्याही एका पक्षाची सत्ता येणार नाही. महायुतीमध्ये असले, तरी विकासाचे कार्यक्रम राबविण्यात कोणतीही अडचण येणार नाही.’

आणखी वाचा-प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती?

‘वैयक्तिक लाभाच्या योजना मते मिळविण्यासाठी राबविल्या जात असल्याचा आरोप विरोधक करत असले, तरी या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्र हातात आल्याचे विरोधकांना वाटू लागले होते; पण लाडकी बहीण योजनेमुळे तो चंद्र निसटला. व्यक्तिगत लाभाच्या अशा योजना सवंग लोकप्रियतेच्या वाटू शकतात. मात्र, वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची गरज आहे. या योजनांमुळे पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना खीळ बसणार नाही. राज्याचे उत्पन्न वाढत आहे. त्या तुलनेत कर्ज कमी आहे,’ असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

‘ते’ मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाही

‘राष्ट्रवादी काँग्रेसमुळे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले, असे मत भाजपच्या मातृसंस्थेने मांडलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका नियतकालिकात तसा लेख आला आहे. त्यामुळे ते मत लेखकाचे वैयक्तिक मत आहे. भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाकडून तसा कोणताही अनुभव आम्हाला नाही. ते नेहमीच सन्मानाची वागणूक देत आहेत. लोकांच्या हितासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत,’ असे सुनील तटकरे यांनी सांगितले. ‘शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे राजकीय कथानक आम्हाला बदनाम करण्यासाठी तयार केले जात आहे. आमचा परतीचा कसलाही विचार नाही. आम्ही निर्णयावर ठाम आहोत,’ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar is the candidate in baramati state president sunil tatkare signal pune print news apk 13 mrj