पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असताना सोमवारी( १७ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यातच रमल्याचे चित्र दिसून आले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सोमवारी पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द झाल्याची, तसेच भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीत गेल्याची चर्चा होती. मात्र, सोमवारी अजित पवार यांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. ते मुंबईतच असून मंगळवारी विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, कार्यालयाचे कामकाज नियमित सुरु राहणार आहे. मंगळवारी अजित पवार आमदारांची बैठक बोलविल्याच्या बातम्या असत्य आहेत. कोणतीही बैठक बोलावली नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.

हेही वाचा >>> पुण्यातील शाळेच्या इमारतीवर ‘एनआयए’कडून टाच

बारामती येथे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आंतराष्ट्रीय कुस्ती आयोजित केली आहे. त्यासाठी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शरद पवार या कुस्ती मैदानात पोहोचले. त्यापूर्वी  सासवड येथील मेळाव्याला आणि माळेगांव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या सभेला पवार यांनी हजेरी लावली. कुस्ती हा खेळ पवार यांच्या आवडीचा असल्याने पवार कुस्तीचे डाव पाहण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळाले.