पुणे : अजित पवार यांना मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काही जणांकडून केला जात आहे. मात्र, मला मिळणारे मत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला म्हणजेच महायुतीला असेल, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे उमेदवार अजित पवार यांनी या आरोपांचे खंडन केले. महायुतीमध्ये गेल्याने माझ्यावर टीका होत आहे. मात्र विचारसरणी वेगळी असताना तुम्हीही शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला ना, अशी विचारणाही त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवित असून त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात होणाऱ्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यानिमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभा मिशन मैदानावर झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

हेही वाचा – महाविकास आघाडीने कल्याणकारी योजनांना स्थगिती दिल्याने राज्याचा विकास खुंटला – केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप

‘बारामतीमध्ये १९६७ पासून १९९० पर्यंत शरद पवार यांनी नेतृत्व केले. त्यानंतर बारामतीचे नेतृत्व माझ्याकडे आले. शरद पवार आणि माझ्या काळात पैसे देऊन सभेसाठी लोक कधीही आणावे लागले नाहीत. मात्र आता सभेला आणलेल्या महिला आम्हाला पैसे दिले नाहीत, चहा-पाणी दिले नाही, अशा तक्रारी करत आहेत. पाचशे रुपये देऊन सभेसाठी महिलांना आणण्याची पद्धत बारामतीमध्ये कधीही नव्हती. या सवयी बारामतीला झेपणाऱ्या नाहीत. तुम्हाला नाद करायचा असेल तर, मग मी पण पुरून उरेन,’ अशा शब्दात अजित पवार यांनी युगेंद्र यांना इशारा दिला. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यावेळी महिलांनाही तिकिटे द्यावी लागतील. तेव्हा कुठून पैसे देऊन लोक आणणार, अशी विचारणाही त्यांनी केली.

निवडणुकीचा ताण कधीच नव्हता

निवडणुकीचा ताण मी कधीही घेतला नाही. मात्र, १९९९ मध्ये चंद्रराव तावरे माझ्याविरोधात उमेदवार असताना मी तणावात होतो. पण त्यावेळीही मी ५० हजारांच्या मतांनी विजयी झालो. आताच्या निवडणुकीत गाव नेत्यांचा राग माझ्यावर काढू नका. तालुका पातळीवरील नेत्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करत आहेत. कोणी कितीही मोठ्या घरातील असो बारामतीमध्ये दादागिरी, गुंडगिरी, दहशत खपवून घेतली जाणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दावा

‘सहानुभूती मिळवू नका’

कुटुंबातील कोणी व्यक्ती माझ्याविरोधात निवडणूक लढवित असेल तर तो त्याचा अधिकार आहे. प्रतिभा काकू मला आईसारख्या आहेत. मात्र त्यांना प्रचारावेळी बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये रोखल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या. माझा विरोधक असला तरी, मी त्याची कामे करतो. मग घरातील व्यक्तीबाबत असे होईल का, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवू नका, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar meeting mission maidan talk on vote and bjp and baramati pune print news apk 13 ssb