लोकसभा निवडणुकीत मावळ व शिरूर मतदारसंघात झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता, त्याचा प्रत्यय पाच वर्षांनंतरही येतो आहे. मागच्या चुका सुधारा आणि पराभवाची परतफेड करा, असे आवाहन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालण्यापेक्षा आपणही मावळ-शिरूरमध्ये तळ ठोकू, अशी ग्वाही दिली आहे.
गेल्या निवडणुकीत मावळमधून आझम पानसरे आणि शिरूरमधून आमदार विलास लांडे यांचा पराभव झाला. बालेकिल्ला म्हणविल्या जाणाऱ्या पुण्यातच शिवसेनेने दोन जागांवर बाजी मारली, याचा राष्ट्रवादीला धक्का बसला होता. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले, तेव्हाच्या विजयी सभेतही अजितदादांनी या पराभवाचा उल्लेख केला होता. पालिका जिंकून दिली, आता मावळ, शिरूरही द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. शुक्रवारी भोसरीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला, तेव्हाही त्यांनी तोच सूर आळवला. मागच्या वेळी चांगली संधी होती. मात्र, आपण अपयशी ठरलो. आता गाफील राहू नका. आपापसातील मतभेद विसरा, नव्या-जुन्यांना एकत्र आणा, कचेरीत गर्दी आणि मतदानात मागे, असे करू नका. पराभवाची परतफेड करायची आहे. उपमुख्यमंत्री म्हणून राज्यभरातून प्रचारात निमंत्रणे येतील. मात्र, आपण मावळ, शिरूर, बारामती असे मोजकेच ४-५ मतदारसंघ निवडणार आणि तेथेच लक्ष्य केंद्रित करणार आहे. माझ्या जिल्ह्य़ातच पराभव होत असताना दुसऱ्या जिल्ह्य़ात जाऊन मी काय सांगणार, असा प्रश्न एखाद्याने विचारला तर आपण उत्तर काय देणार, असा मुद्दाही अजितदादांनी उपस्थित केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात ताणतणाव असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र सर्वकाही व्यवस्थित होईल आणि एकत्रित प्रचार करावा लागणार, याची खात्री वाटते आहे. भोसरीत बोलताना त्यांनी दोन्ही काँग्रेसने एकत्र मेळावे घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी एकत्र बसावे लागणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader