बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी उघडपणे शरद पवार यांची बाजू घेतली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ते प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत. बारामती तालुक्यातील गावोगावी फिरून ते मतदारांच्या गाठीभेटी घेत शरद पवार यांना साथ देण्याचे आवाहन करीत आहेत.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी या गावाला युगेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, बारामती सुरुवातीपासूनच विकसित आहे, असे नव्या पिढीला जे वाटते तशी स्थिती नव्हती. शरद पवार यांनी कंपन्या, एमआयडीसी आणून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण केल्या. शरद पवार यांच्यामुळेच बारामतीची जगभरात ओळख आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात शरद पवार यांच्यासमवेत उभे राहून त्यांना साथ देण्याची गरज आहे.

हेही वाचा – प्रवाशांना खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार

हेही वाचा – चाकणमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कोठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांना साथ देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे सांगून युगेंद्र पवार म्हणाले, की मी राजकीय व्यक्ती नाही. सामाजिक क्षेत्रात काम करतो. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भागाच्या विकासासाठी खूप काही केले आहे. शरद पवार यांनी तलाव उभारून पाणी आणले. भविष्यातील शिक्षण कोणत्या दिशेने असेल याचा अंदाज आल्यानंतर ५० वर्षांपूर्वी त्यांनी विद्या प्रतिष्ठानची स्थापना करून इंग्रजी शाळा सुरू केल्या. शेतकऱ्यांसाठी त्यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट सुरू केले.

Story img Loader