पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यात कोणताही रस नसल्याचे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी खळबळ उडवून दिली. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीने निर्णय घेतला तर जय पवार यांना उमेदवारी मिळू शकते असे ते म्हणाले. महाविकास आघाडीकडून अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे बारामतीमध्ये दोन चुलत बंधूंमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बारामतीमधून जय पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आपल्याला बारामतीतून निवडणूक लढविण्यात कोणताही रस नसल्याचे पवार म्हणाले. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीचा निर्णय असेल तर जय यांना मिळू शकते.

हेही वाचा >>>पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सीचे पारपत्र निलंबितच राहणार, संबंधित कागदपत्रे मिळण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

दरम्यान, अजित पवार यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून लढवल्या जातील. एखाद्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाते तेव्हा त्या नेतृत्वानेसुद्धा निवडणूक लढवावी असे अभिप्रेत असते. अजित पवार यांनी केलेले वक्तव्य कोणत्या अनुषंगाने केले हे मला माहीत नाही. मात्र संसदीय बोर्ड आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार हे विधानसभेच्या रिंगणात असतील असे आपले मत असल्याचे तटकरे म्हणाले.

कर्जत-जामखेडमध्ये काका विरुद्ध पुतण्या?

बारामतीमधून जय पवार यांनी निवडणूक लढविल्यास अजित पवार कोठून निवडणूक लढविणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवावी त्यासाठी दबाब असल्याचा आरोप विद्यामान आमदार व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांनी भाजपचे मांडलिकत्व स्वीकारल्याने क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरल्याची टिप्पणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडमध्ये काका-पुतण्यात लढत होणार का, याची उत्सुकता आहे.

मी बारामतीमधून सात ते आठ वेळा निवडणूक लढविली आणि निवडून आलो. बारामतीमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावर जनतेचा कौल ज्याच्या बाजूने असेल त्याप्रमाणे पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल. तो आम्हाला मान्य असेल. – अजित पवार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar nephew yugendra pawar is likely to get candidature from baramati assembly constituency amy