पिंपरी : महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील ९३८ सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पार पडली. यावेळी भाषण करताना अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले की, मी १९९१ ला पिंपरी-चिंचवडमधून पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे एक किंवा दोन अपत्यावर थांबावे. नाही तर ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही जबाबदारी आहे.
सोडतीमध्ये घर मिळाले नाही म्हणून नाराज झाले तरी चालेल परंतु निराश मात्र होऊ नका, निराशा वाईट असते. निराश होऊन हिम्मत हारू नका असे आवाहनही अजित पवार यांनी लाभार्थ्यांना केले. तसेच निर्व्यसनी रहा, घर मिळाले नाही म्हणून पैसे उधळत बसू नका, चौफुला, टेंभुर्णीला जाऊ नका असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा उडाला. पैसे साठवा, त्यात भर घाला. घराचे स्वप्न एक दिवस पूर्ण होईल, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : “तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशा शहाण्यांना…”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
सोडत पारदर्शक आहे. एकाही माणसाचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याची कोणतीही संधी नाही. कोणताही दलाल महापालिकेने नेमला नाही. नंबर काढून देतो म्हणणाऱ्यांची तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशा शहाण्यांना सोडणार नाही. साला म्हणणार होतो पण नको शहणाचा म्हणतो असे सांगत अजित पवार यांनी घराचा ताबा तत्काळ देण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली.