राज्यात यात्रा, वाढदिवसनिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या डान्स शोचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने डान्स केला आहे. डान्सचा तो व्हिडीओ समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत आहे. याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.
‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री?’ या वक्तव्यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे,” असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : “महाराष्ट्रात मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस…”, बारसूतील लाठीचार्जनंतर संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले…
“बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.
धारशिव येथील अजित पवारांच्या सासुरवाडीत ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स लावण्यात आले होते. यावरूनही अजित पवारांनी फटकारलं आहे. “असे बॅनर्स कोणी लावू नये. बॅनर्स लावून कोणीही मुख्यमंत्री बनत नसतं. त्यासाठी १४५ चे बहुमत लागते. एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या कृल्प्त्या वापरून बहुमत मिळवलं. कोणालाच वाटलं नव्हतं ते मुख्यमंत्री बनतील. सासुरवाडीत माझ्यावर प्रेम उतू चाललंय. पण, सहकाऱ्यांना आवाहन करतो की, हा अतिशय चुकीचा आग्रह आहे. आपआपलं काम करा. आमदारांची संख्या वाढवा, तुमच्या विचारांचे आमदार निवडून आले, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभले आणि आमदारांनी पाठिंबा दिला तर होऊ शकतं,” असेही अजित पवारांनी म्हटलं.