गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना प्रशासनासाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. गंभीर बाब म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांना अजित पवारांचं आवाहन!

आज झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय २ एप्रिलसंदर्भात घेण्यता आला. “लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

काय आहेत नवे नियम?

१) खासगी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात ८० टक्के बेड घेतले होते, आता ५० टक्के बेड करोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

२) १ तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत.

३) शाळा-महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.

४) मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असेल. सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.

५) लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक संख्या अजिबात नकोय. अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी असेल. हे सगळे निर्णय नाईलाजास्तव घ्यावे लागले आहेत.

६) सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू राहतील, नंतर ते बंद असतील.

“आजही काही भागात जनतेच्या मनात सुरुवातीला जी भिती होती ती राहिलेली नाही. आजच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना विचारलं आहे की लसीकरणाची ३१६ केंद्र दोन्ही शहरांत आहेत, ती दुप्पट करू शकतो का? तसं केलं तर लसीकरणाचा कार्यक्रम पुण्यात सर्वात जास्त घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करता येईल. त्यावर प्रकाश जावडेकरांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “बेडची संख्या वाढवण्याचं काम, लसीकरणाचा वेग ३०० वरून ६०० केंद्रांपर्यंत नेण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी लसीचे डोस कमी पडतील की काय, ही बाब केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहे. लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केली आहे. प्रकाश जावडेकरांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

काय आहे आकडेवारी?

गुरुवारी दिवसभरात पुण्यात तब्बल ३ हजार २८६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा २ लाख ४७ हजार ६२९ पर्यंत पोहोचला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी दिवभरात १ हजार ८६५ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख २६ हजार ९३६वर पोहोचली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on lockdown in pune pimpri chinchwad speak on vaccination pmw