राष्ट्रवादीचा मेळावा, नियुक्त्या अन् बैठकांचे नियोजन
पिंपरी पालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात कमालीची मरगळ होती. ती दूर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार महिन्यानंतर वेळ काढला आहे. सहा जुलैला दिवसभर पवार पिंपरी-चिंचवडला तळ ठोकणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे मेळावे, बैठका होणार असून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ‘संवाद’ होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भरीव विकासकामे करूनही जनतेने नाकारले म्हणून अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे निकालानंतर ते शहरात फिरकले नाहीत. ‘अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी’ अशी पिंपरीत पक्षाची व्याख्या आहे. त्यामुळे पवार येत नाहीत म्हणून पदाधिकारी व नेतेही पक्षाच्या कार्यक्रमाकडे फिरकत नव्हते. परिणामी, पक्षात नैराश्य, मरगळ दिसून येत होती. स्थानिक नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अजित पवारांनी गुरूवार, सहा जुलैचा दिवस पिंपरी-चिंचवडसाठी दिला आहे. यानिमित्ताने चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी पवार व तटकरे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. महिला आघाडी तसेच युवक आघाडीचे अध्यक्षपद रिक्त आहे. या दोन्ही नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.