पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘खटाखट खटाखट’ गरिबी हटाव असे विधान केले होते. त्यामुळे मी ग्रामीण भागात प्रचलित असलेला ‘कचाकचा’ हा शब्द प्रयोग केला. त्याचा कोणी फार बाऊ करण्याची आवश्यकता नाही. माझ्या विधानाचा ‘ध’ चा ‘मा’ करण्याची आश्यकता नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी येथे दिले.
‘मतदान यंत्रात कचाकचा बटण दाबा…म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’ आणि ‘एक हजार मुलांमागे मुलींचा दर ७९० पर्यंत गेला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? असा प्रश्न पडतो.’ अशी वादग्रस्त वक्तव्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथे मेळाव्यात बुधवारी केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्याबाबतचा खुलासा केला.
हेही वाचा – दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल १० मे रोजी; सीबीआय, बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण
‘मी हसत, गमतीने ते विधान केले होते. वैद्यकीय क्षेत्रातील आणि वकील मंडळी यांच्या उपस्थितीत एका सभागृहात मेळावा होता. ती जाहीर सभा नव्हती. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये विविध विकासकामे करण्याचे आश्वासन दिले जाते. मग ते प्रलोभन आहे का,’ असे पवार यांनी सांगितले.
विकासकामांना निधी देण्याचे अधिकार स्थानिक आमदार आणि खासदारांचे आहेत. त्यामुळे आधीच्या खासदारापेक्षा जास्त निधी देण्याचे, जास्त विकास करण्याचे आश्वासन दिले. आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची मी सातत्याने काळजी घेत असतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खटाखट खटाखट गरिबी हटाव, असे विधान केले होते. ग्रामीण भाषेतील शब्द मी वापरला. त्याबाबत कोणी बाऊ करण्याची आवश्यकता नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.