आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काय, आती म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी प्रबळ इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.चिंचवड येथील एका खासगी कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होते. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता.
ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केल्याचा खुलासाही त्यांनी केला.एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आमच्या कानावर सातत्याने येत होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत होते. शिंदे यांना ठाण्यातील अधिकारी नेमण्याचे सर्वाधिकार दिले होते. बंडखोरीच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी आमदार जिथे असतील. तेथून त्यांना मातोश्रीवर आणण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या होत्या. पण, अधिका-यांनी शिंदे यांच्यासोबत निष्ठा ठेवत त्यांच्यासह आमदारांना सुरळीतपणे मुंबईबाहेर जावू दिले. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांना ज्याप्रमाणे नेत्यांनी एकत्र ठेवले. त्याचप्रमाणे शिवसेनेतील बंडावेळी तीन पक्षाच्या नेत्यांनी आमदारांना एकत्र ठेवले असते तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते.
हेही वाचा >>>जळगाव: सावद्यात रविवारी पहिली राज्यस्तरीय केळी परिषद
शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याबाबत पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे हे अतिशय खालच्या पातळीवर टीका करत होते. त्यामुळे ठरवून आणि जाहीर सांगून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाडले. कोणाला मस्ती आली तर ती जिरविण्याची आपल्यात ताकद आहे. मी स्पष्ट बोलतो. मनात आहे ते सांगतो. लोकांना मला ऐकायला आवडते. त्यामुळे माझा ‘टीआरपी’ वाढतो. काहीजण हातचे राखून बोलतात. राजकीय आकसातून कोणाच्या चौकशा करू नये. आम्ही सरकारमध्ये असताना जाणीवपूर्वक कोणाला त्रास दिला. जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी फारकाळ टिकत नाहीत, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे ‘गचुरे’ धरावे का?
मी विरोधी पक्षनेता म्हणून चुकीच्या कामाविरोधात बोलतो. राजकारणात विनाकारण कोणावर टीका करत नाही. चुकीचे असेल तरच टीका करत असतो. राजकीय विचारधारा वेगळी असली. तरी, आम्ही एकमेकांचे दुष्मन नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे ‘गचुरे’ धरल्यावरच आमचे साटेलोटे नाही असे सर्वांना वाटेल का? आमचे काही साटेलोटे नाही. आमचा जन्म एकाच दिवशीचा असून साल वेगळे आहे. बाकी काही नाही, असेही पवार म्हणाले.
तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल
अनुभव नसला की मी-मी म्हणणारे चुकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान म्हटले होते. तर, राज्य लोकसेवा आयोग (एमपीएसीचा) प्रश्न निवडणूक आयोगाकडे आहे असे म्हणाले होते. ते आता अनुभवातून शिकतील. जोपर्यंत शिकतील तोपर्यंत त्यांचे मुख्यमंत्री पद जाईल.
मतांची विभागणी टळल्यास २०२४ ला वेगळे चित्र दिसेल
सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजेत. मतांची विभागणी होता कामा नये. मतांची विभागणी न झाल्यास काय होते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिसले. त्यामुळे विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये समन्वय ठेवून महाविकास आघाडीने जागावाटप केले. तर, वेगळे चित्र पहायला मिळेल. यापुढील काळात आघाड्यांचेच सरकार चालेल. आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता कमी आहे, असेही ते म्हणाले.