पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सायंकाळ होईपर्यंत जास्तीत जास्त पाणी धरणांमधून नदीत सोडण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. दिवसा जास्त पाणी सोडल्यास रात्री धरणांच्या परिसरात पाऊस झाल्यास ते पाणी साठविता येईल. परिणामी नागरिकांना त्रास होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.
पुण्यात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पालकमंत्री पवार यांनी तातडीने मुंबईहून पुणे गाठले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी या वेळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील पूरस्थितीची माहिती पालकमंत्री पवार यांना दिली.
पालकमंत्री पवार म्हणाले, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेवढे पाणी येत आहे, त्यापेक्षा जास्त पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून रात्रीतून जास्त पाऊस झाला, तरी ते पाणी धरणांमध्ये साठविता येईल. उजेड असेपर्यंत जास्तीत जास्त विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंधार झाल्यानंतर धरणांमधून जास्त पाणी सोडल्यास नागरिकांना त्रास होईल. निरा, खडकवासला, चासकमान सर्व कालवे सुरू करण्याची सूचना केली आहे. सर्व धरणांचे टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जनाई शिरसाई पुरंदर या सर्व उपसा सिंचन योजना चालू करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनांमधून पाणी उपसा होऊन वरच्या भागात जाईल जेथे पाण्याची कमतरता आहे. पुण्यातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. काही नागरिक स्वत:हून त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत. मुख्यमंत्री माझ्या आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.