लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दाणादाण उडाल्यानंतर गेल्या दोन निवडणुकांमध्ये निर्विवाद बहुमत देणाऱ्या पिंपरी पालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी ‘कारभारी’ अजित पवार यांनी आतापासून डावपेचास सुरुवात केली आहे. विरोधी नेत्यांना खिशात घालण्याबरोबरच स्वपक्षीय नेत्यांमध्ये किमान निवडणुकीपुरती एकजूट राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्थानिक नेत्यांच्या हातात कारभार दिल्यास काय होते, याचा पुरता अनुभव असल्याने ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यापुढील सर्व सुत्रे स्वत:कडे घेतल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी बालेकिल्ल्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत गढूळ झालेल्या वातावरणात राष्ट्रवादीत फूट पडण्याची अजितदादांना धास्ती आहे. लोकसभा, विधानसभेतील चित्र येत्या पालिका निवडणुकीत दिसू नये, यासाठी त्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ६० जागा आणि २०१२  च्या निवडणुकीत ८३ जागा निवडून आल्या, हे एकतर्फी बहुमत यापुढेही कायम राखण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे. भाजप-शिवसेनेचे कडवे आव्हान असल्याने दोन वर्षांआधीच ते कामाला लागले आहेत. बराच काळ शहराकडे न फिरकणारे अजितदादा आता अलीकडे वारंवार येऊ लागलेत. मंगळवारी त्यांनी नगरसेवकांची तसेच प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आणि सर्वाचे म्हणणे ऐकून घेतले. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना बोलावून घेत अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी सविस्तर माहिती घेतली. शहरातील विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीलाच मिळेल, यादृष्टीने आवश्यक वातावरण निर्मितीचा प्रयत्नही त्यांनी केला. फटकळपणासाठी प्रसिध्द असलेले अजितदादा समजुतीच्या सुरात सांगतात, असा अनुभव पक्षातील नगरसेवक सांगतात. स्थायीसाठी इच्छुक असलेल्या ५७ नगरसेवकांना त्यांनी त्याच पध्दतीने समजावून सांगितले. स्थानिक नेत्यांच्या ‘कोटा’पध्दतीमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे सांगत स्वत:च्या अधिकारात नियुक्त्या करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.
अजितदादांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप आता भाजपमध्ये गेले आहेत. राष्ट्रवादीचे दुसरे शिलेदार विलास लांडे नाराज असून त्यांची वाटचाल गूढ स्वरूपाची आहे. अजितदादांनी मोक्याच्या क्षणी स्थायी समितीचे अध्यक्षपद दिलेल्या महेश लांडगे यांनीच विलास लांडे यांचा पराभव केला. मात्र आमदार झाल्यापासून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. ते राष्ट्रवादीच्या बैठकांना उपस्थित राहतात. मात्र, त्यांचा एक पाय भाजपमध्ये आहे. माजी आमदार अण्णा बनसोडे पराभवानंतर थंड पडले आहेत. पालिकेच्या राजकारणात शहराध्यक्ष योगेश बहल आणि पक्षनेत्या मंगला कदम यांच्या एककल्ली कारभाराला राष्ट्रवादीचेच नगरसेवक वैतागले आहेत. अजितदादांच्या कार्यपध्दतीला कंटाळून काँग्रेसमध्ये गेलेले व जगताप भाजपवासी होताच पुन्हा राष्ट्रवादीत आलेले आझम पानसरे पालिकेतील नेतृत्वाची धुरा पुन्हा आपल्याकडे यावी, यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांना बहल-कदमांचा अडसर आहे. अशा परिस्थितीत, ताकद वाढलेल्या भाजप-सेनेशी राष्ट्रवादीला दोन हात करायचे आहेत. स्थानिक पातळीवर चालणारे संगनमताचे राजकारण अजितदादांना पुरेपूर माहिती आहे, विरोधी नेत्यांना गोंजारण्याचे काम त्यांनी यापूर्वीच सुरू केले आहे. ‘लक्ष्य २०१७’ मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या हातात कारभार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा