लोकसभेच्या प्रचारानंतर अद्याप पिंपरी-चिंचवड शहराकडे न फिरकलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी भल्या सकाळी सहा वाजताच शहरात आले आणि तब्बल साडेतीन तास त्यांनी विविध विकासकामे, प्रस्तावित बीआरटी रस्ते व अन्य प्रकल्पांची पाहणी केली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांना दिले.
लोकसभेसाठी मावळ, शिरूरमध्ये तळ ठोकून बसण्याची घोषणा अजितदादांनी केली होती. प्रत्यक्षात त्यांनी तळ ठोकून काहीच उपयोग झाला नाही. दोन्हीही मतदारसंघात राष्ट्रवादीची दाणादाण उडाली. निवडणुकीचा प्रचार संपल्यापासून ते निकाल लागेपर्यंत अजितदादा शहरात आले नव्हते आणि निकालानंतरही त्यांनी येणे टाळले. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर ते प्रथमच शहरात आले आणि त्यांनी भरपूर वेळही दिला. सकाळी सहा वाजता ते औंध-सांगवीच्या राजीव गांधी पुलावर होते. तेथून पुढे त्यांनी सांगवी-किवळे, पुणे-मुंबई, काळेवाडी-नाशिकफाटा बीआरटी रस्ते तसेच पुणे-आळंदी, ऑटोक्लस्टरचा रस्ता, भोसरी उड्डाणपूल आदी मार्गाची पाहणी केली. संत नामदेवमहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या शिल्पस्थळाची व आराखडय़ाचीही त्यांनी पाहणी केली. आमदार विलास लांडे, आयुक्त जाधव, अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानेश्वर जुंधारे, उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके आदी उपस्थित होते. दिघी-दत्तनगर ते आळंदी रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याचे सांगत या मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार लांडे यांनी केली. त्यानुसार, या कामाच्या तातडीने निविदा काढण्याच्या सूचना अजितदादांनी केल्याचे लांडे यांनी सांगितले. सहापासून सुरू झालेला अजितदादांचा पाहणी दौरा साडेनऊच्या सुमारास पूर्ण झाला आणि ते पुण्याकडे रवाना झाले. या दौऱ्याविषयी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच नगरसेवकांना कल्पना देण्यात आली नव्हती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा