हौदात विसर्जन झालेल्या मूर्ती पुन्हा नदीत विसर्जित करीत शहर बकाल करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवू नका, असे आदेश माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौरांना दिले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शहरातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर मानाच्या गणपतींनी महापालिकेच्या हौदामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक गणेश मंडळांनी आपल्या श्रींच्या मूर्तीचे हौदामध्येच विसर्जन केले. मात्र, हौदामध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीमध्ये विसर्जित करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये हा विषय उपस्थित करून महापौरांना कडक कारवाईचे आदेश दिले.
अजित पवार म्हणाले,‘एकदा हौदामध्ये विसर्जन झालेल्या मूर्ती पुन्हा नदीमध्ये आणून टाकण्याचे काम करण्याच्या प्रकाराला कोण अधिकारी दोषी आहेत त्यांचा मुलाहिजा ठेवू नका. त्याचे आई-बाप कोणीही असो, त्याच्याविरोधात कारवाई करताना कचरू नका. पुणेकर नागरिक तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात असताना नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी झालेला निर्णय डावलून शहराला बकाल करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर अशा प्रवृत्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे.
ज्या ट्रकमधून या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित करण्यात आल्या त्या ट्रकवाल्याला दहा हजार रुपये दंड ठोठवा. या ट्रकची माहिती देणाऱ्या व्यक्तीस साडेसात हजार रुपयांचे बक्षीस द्या, जेणेकरून अशा प्रवृत्तीला आळा बसेल आणि महापालिकेच्या तिजोरीमध्ये अडीच हजार रुपयांची भर पडेल, असेही अजित पवार यांनी महापौरांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा