पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, सुनील शेळके, सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचनेचे अजित पवार यांनी कौतुक केले.

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघेजण बैठकीला आले होते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी उपस्थित केलेले काही मुद्धे चर्चेचे ठरले. बैठकीत सुप्रिया सुळे यांनी एक सूचना केली. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”, आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद

हेही वाचा – शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच, पण..; सुनील शेळके नेमकं असं का म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कोणते प्रश्न आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या अधिवेशनाअगोदर राज्यातील सर्व खासदारांची बैठक घेतली पाहिजे. याने राज्यातील प्रश्न संसदेत मांडणे शक्य होईल, अशी चांगली सूचना आजच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केली. मात्र आजवर राज्य सरकारमार्फत एकूणच प्रश्नांबाबत एक पुस्तिका काढण्यात येते आणि ती पुस्तिका सर्व खासदारांना पाठवली जाते. पण आजच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. पण लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क होईल, असे सांगत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.