पुणे : बारामती येथील अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत डावलण्यात आल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांचा उल्लेख केला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला असून राज्य शासनाने राजशिष्टाचाराच्या नियमात काही बदल केले आहेत का, अशी विचारणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारमती येथील अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील सभागृहाचे उद्घाटन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंगळवारी (१० सप्टेंबर) झाले. हा शासकीय कार्यक्रम असतानाही निमंत्रण पत्रिकेत खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे देण्यात आली नव्हती. निमंत्रण पत्रिकेत रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. चंद्रकांत म्हस्के, अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. अमोल शिंदे आणि डाॅ. विवेक सहस्त्रबुद्धे यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रकारावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय कार्यक्रम असूनही राजशिष्टाचाराचे पालन झाल्याचे दिसत नाही, अशी टीकाही सुळे यांनी केली. त्या म्हणाल्या की, कार्यक्रम झाला, ही आनंदाची बाब आहे. मात्र, या शासकीय कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाहिल्यावर आश्चर्य वाटले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे नाव त्यामध्ये नाही. या कार्यक्रमाचे निमंत्रण मला आणि शरद पवार यांना नव्हते. अजित पवार यांना निमंत्रण होते की नाही, हे माहिती नाही. मात्र, निमंत्रण असते तर, आम्ही आनंदाने कार्यक्रमाला आलो असतो.

हेही वाचा – साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून होणार निवड

कार्यक्रमावेळी राजशिष्टाचाराचे पालन झाल्याचे दिसत नाही. निमंत्रण पत्रिकेत जी नावे आहेत, ती राजशिष्टाचाराच्या कोणत्या नियमात बसतात, हे समजत नाही. देश राज्यघटनेवर चालत आहे. राज्य सरकारने राजशिष्टाचाराच्या नियमात काही बदल केले असतील तर, त्याची माहिती द्यावी, अशी टीका सुळे यांनी केली.

हेही वाचा – पुणे : घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक बदल

मुख्यमंत्र्यांकडे विचारणा

दरम्यान, या वादानंतर रुग्णालय प्रशासनाने बुधवारी बैठक घेतली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. निमंत्रण पत्रिकेतील नावे डावलण्यासंदर्भात या बैठकीत अधिष्ठातांकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. असा कोणताही कार्यक्रम झाला नाही, असे त्यांनी सांगितले. मग कार्यक्रमाची छायाचित्रे कशी प्रसिद्ध झाली, अशी विचारणा सुळे यांनी केली. त्या म्हणाल्या की, कार्यक्रमाचा वाद आणि या बैठकीचा कोणताही संबंध नाही. रुग्णालयातील अडचणींसंदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मला बैठक घ्यायची होती. मात्र या बैठकीत मी अधिष्ठातांकडे कार्यक्रमाबाबत विचारणा केली. त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. कार्यक्रमावेळी राजशिष्टाचाराचे पालन झाले की नाही, याची विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे, असे सुळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar private secretary on the platform in baramati government program what supriya sule said pune print news apk 13 ssb