कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. दोन्ही पक्षांचे मोठे नेते याठिकाणी सभा घेत आहेत. दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला. तसेच पुणे महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपालाही लक्ष्य केलं.
काय म्हणाले अजित पवार?
पुणे महापालिकेत २०१७ ते २०२२ दरम्यान जे ठेके दिल्या गेले, त्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा समावेश होता. यातून कोट्यवधी रुपये कमावण्याचं काम झालं. करोना काळात आम्ही जनतेला लस आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत होतो. जम्बो रुग्णालयं आम्ही उभी केली. मात्र, कोणी भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मात्र, पुणे महापालिकेत करोना काळात अनेक घोटाळे करत यांनी कोट्यवधी रुपये कमावले. इंटरनेटची केबल टाकण्याच्या कामात ३०० कोटीचा भ्रष्टाचार झाला. जेव्हा करोना काळात रस्त्यावर कोणी फिरत नव्हतं, त्यावेळी कुत्र्यांची नसबंदी केल्याचं आढळून आलं. यात भाजपाचे नेते भागीदार होते. जेव्हा रस्त्यावर कोणी नव्हतं, तेव्हा यांना कुत्र्यांची नसबंदी सुचत होती. यांची डोकी फिरली होती का? यांनी अक्कल कुठं पाजळली हेच कळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.
मी उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत
मी अनेक वर्ष पिंपरी चिंचवडचा पालकमंत्री होतो. या शहरात आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामं केली. अनेकदा मी सकाळी ६ वाजता सगळे झोपत असताना आयुक्तांना घेऊन फिरत होतो. कुठं पाणी आलं पाहिजे, कुठं उड्डाण पूल पाहिजे, याची माहिती घेत होते. मी नुसता उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत. आता बाहेरची लोकं येऊन इथे रॅली काढत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रॅली काढावी, इतकी वाईट अवस्था त्यांची झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते आणि निघून जायचं असतं. विशेष म्हणजे रॅली काढली कुठं? तर जिथं मी आदल्या दिवशी रॅली काढली तिथंच यांनी रॅली काढली, अशी टीका अजित पवार यांनी केली.
हेही वाचा – राज्यात खरंच मध्यावधी निवडणुका लागू शकतात? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया!
मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटली
मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटली. मुख्यमंत्र्यांना याआधी आश्वासनांची पूर्ती करू नका असे कोणी सांगितलं होतं? आज पुण्यात झोपडपट्टी, एसआरए आणि अनाधिकृत बांधकामासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मेट्रोचा प्रकल्प आम्ही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर केला. मात्र, काही जण म्हणतात, आम्ही दिल्लीला गेलो, तिथे मेट्रो बघितली म्हणून इथं मेट्रो आणली. कुठं तरी खरं बोला, असेही ते म्हणाले.