चिंचवड पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हींसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक, ज्येष्ठ नेते यांच्या जोरदार सभा सुरू असून, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाईक रॅली नुकतीच झाली. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार ताकद लावत आहेत. अजित पवारांनी उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव आणि सांगवी परिसरात प्रचार रॅली काढली. जगताप यांच्या कार्यालयासमोरून जात असताना भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पक्षांतील नेते चिंचवड मतदारसंघात ठाण मांडून आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, रोहित पवार यांच्यासारखे दिगग्ज नेते मैदानात उतरले असून, कोपरा सभा, रॅली घेत आहेत. आज मात्र, भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवीत रॅली काढण्यात आली.
हेही वाचा – मनसे नेते वसंत मोरे म्हणतात.. “ही आहे माझी सोशल मीडियाची पॉवर”
लक्ष्मण जगताप यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोरून अजित पवार यांची बाईक रॅली गेली. तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची झाल्याचे एकूण चित्र आहे. यात कोण बाजी मारेल हे बघावे लागेल. दरम्यान, रॅलीच्या आगोदर अजित पवार म्हणाले की, “चिंचवड आणि पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रॅली काढण्याची वेळ आली असून, देवेंद्र फडणवीस हे स्वतः या निवडणुकीवर लक्ष देऊन आहेत. ते सभा घेत आहेत. भाजपाचे अनेक नेते मतदारसंघात ठाण मांडून आहेत,” असे ते म्हणाले.
अजित पवारांची रॅली अन् भाजपा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर!
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयासमोरून अजित पवारांची बाईक रॅली जात होती. तेव्हा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्साहात होते. घोषणाबाजी, डीजे सुरू होता. हे पाहून भाजपाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झेंडे दाखवले. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाच्या समोरून राष्ट्रवादीची बाईक रॅली जात होती.