पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चित्रीत केलेल्या रॅप गाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभिन्नता असल्याचे चित्र आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी रॅप करणाऱ्या तरुणाला पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळा मार्ग घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
विद्यापीठात चित्रीत केलेल्या सल्तनत या रॅप गाण्यात आक्षेपार्ह शब्द असल्याचा आक्षेप घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या गाण्याच्या चित्रीकरणाला परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत कुलगुरूंकडे तक्रार नोंदवली. विद्यापीठाने या गाण्याच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रॅप केलेल्या तरुणाला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेकडूनच गाण्यावर आक्षेप आणि समर्थन असा विरोधाभास दिसून आला. विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तूला फार मोठा इतिहास आहे. असे असताना या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी अश्लील भाषेतील रॅप सॉंगचे चित्रीकरण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासन स्तरावरूनही आदेश द्यावेत. भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात अथवा शिक्षण संकुलात होणार नाही, या दृष्टिकोनातून शासनामार्फत मार्गदर्शन सूचना द्याव्यात, असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.