ऑईल रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार होता. पण, तिथे विरोध झाल्याने बारसूची जागा निवडली आहे. मी देखील बारसूला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी राजन साळवी यांचा बारसूच्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. विकासाच्याबाबत सत्ता कोणाचीही असो किंवा नसो. सर्वांनी सकारात्मक रित्या पाहिलं पाहिजे. सरकारने संवेदनशील मार्गाने हा प्रश्न सोडवायला हवा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“बारसू प्रकल्पासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. उदय सामंत यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत, स्थानिक लोकांचा किती विरोध आहे. किती संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. बाहेरची कितीजण आंदोलनात आले आहेत, याची माहिती घेणार आहे. काही मोठ्या प्रकल्पाला विरोध होत असतो. पण, चर्चेतून मार्ग काढल्यावर तो विरोध मावळतो. समृद्ध महामार्ग याचं उदाहरण आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : “२०२४ ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार”, जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवारांचं नऊ शब्दांत उत्तर, म्हणाले…
“राज्यात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. बेरोजगारी दूर करायची असेल, तर मोठे प्रकल्प आणले गेले पाहिजेत. त्याशिवाय रोजगार निर्माण होणार नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळेल, असं बोललं जातं,” असं अजित पवारांनी म्हटलं.
“एन्रॉन प्रकल्पाच्याबाबत असेच वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन विरोधी पक्षाने एन्रॉन प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचं सांगत, शरद पवार आणि तत्कालीन सरकारची प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं. पण, नंतर गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी हेच सरकारमध्ये आले. त्यांनी एन्रॉन प्रकल्प मार्गी लावला. कुठं आंबा, काजूचं झाड खराब झालं? कुठं मासेमारीवर परिणाम झाला,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस, त्यांनी कधीही…,” सुहास कांदेंनी दिलं आव्हान
“कोणतेही प्रकल्प येत असताना भावी पिढीचं नुकसान करण्याचा हक्क कोणालाही दिला नाही,” असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.