पुणे : “दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सदर प्रतिक्रिया दिली. अजित पवार पुढे म्हणाले की, राजीव सातव यांनी आमदार, खासदार म्हणून चांगले काम केल आणि त्यापूर्वी त्यांच्या आईदेखील आमदार राहिल्या आहेत. राजीव सातव यांच्या कुटुंबीयाला राजकीय वारसा लाभला आहे. त्याचदरम्यान राजीव सातव यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या आमदार म्हणून काम करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावरदेखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करित असून, प्रत्येकाच संरक्षण करणे ही राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी असते. या घटनेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
हेही वाचा – कसबा, चिंचवडसाठी ‘होऊ दे खर्च’; उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा २८ वरून ४० लाखांवर
प्रज्ञा सातव यांना संरक्षण दिले पाहिजे. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली.