पिंपरी : पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. शहारात जागा उपलब्ध असल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहप्रकल्प उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. लोकांची मानसिकता, प्रतिसाद असेल तर चर्चा करून गृहप्रकल्प राबविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच ज्या विकसकांनी पुर्नवसन प्रकल्प अनेक वर्षे रखडवले आहेत. त्यांना नोटीस देऊन प्रकल्प ताब्यात घेऊन म्हाडाच्या माध्यमातून विकसित करावेत, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणकीय सोडत काढली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, प्रकल्पांतील लाभार्थी निश्चित करण्यासाठीची संगणकीय सोडत पारदर्शकपणे काढली आहे. तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाही तर काही शहाणे असतात, जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही दलाल प्रशासनाने नेमलेले नसतात. अगदी कोणाचे स्वीय सहाय्यक असतील त्यांच्यावरही विश्वास ठेवू नका. नाही तर दस का बीसचे प्रकार घडतात. आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळेच तुमचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. नंबर काढून देतो म्हणणाऱ्यांची तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशा शहाण्यांना सोडणार नाही. सोडतीमध्ये घर नाही मिळाले म्हणून नाराज झाले तरी चालेल परंतु निराश मात्र होऊ नका, निराशा वाईट असते. निराश होऊन हिम्मत हरू नका असे आवाहनही त्यांनी लाभार्थ्यांना केले.
हेही वाचा : “एक किंवा दोन अपत्यावर थांबा, नाही तर ब्रह्मदेव…”; अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी
रावेत येथील गायरान जागेवरील प्रकल्पाविरोधात कोणी तरी न्यायालयात गेले आहे. न्यायालयात जाऊन काय साध्य होणार आहे. गरिबांना घरे मिळत असताना कोणाच्या पोटात दुखण्याची काय गरज आहे. झोपडपट्टी विरहित शहर करणे सर्वांचे स्वप्न आहे. त्यासाठी आडकाठी आणून प्रकल्प थांबविणे चुकीचे आहे. यामुळे प्रकल्प रखडतात, किंमत वाढते. नागरिक घरापासून वंचित राहतात, असेही ते म्हणाले.