पिंपरी- चिंचवड: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे. असं परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आपली मातृभाषा ही मराठी आहे. त्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात दर्जा देण्याचे धाडस केवळ मोदींनी केल्याचा उल्लेख देखील यावेळी अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, जगामध्ये बहुतांश देशात इंग्रजी भाषा बोलली जाते. भारतात हिंदी भाषा बोलली जाते. ती राष्ट्रभाषा आहे, यावरून अनेक वाद आहेत. मी त्यात जाणार नाही. परंतु, ज्या पद्धतीने बहुतांश देशांमध्ये इंग्रजी बोलली जाते त्याचप्रमाणे तिन्ही भाषा बोलल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्या मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे.

नाशिक येथे झालेल्या दंगली वरून देखील अजित पवारांनी भाष्य केलं. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था महत्त्वाचा आहे. तो कुठल्या राजकीय पक्षाचा, पार्टीचा असला याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेसाठी त्याची खैर केली जाणार नाही. असे अजित पवारांनी नमूद केलं.

दरम्यान कासले यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी मत व्यक्त केलं. कुणीही आरोप केल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. परंतु, निलंबित केलेल्या व्यक्तीच्या आरोपाला आपण किती महत्त्व द्यायचं याचा विचार करायला हवा. असं देखील अजित पवारांनी अधोरेखित केलं.