राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र मिळून ही निवडणूक लढलो असतो, तर निर्णय वेगळा आला असता. परंतु सर्वजण वेगवेगळे लढले, त्यामुळे हा निकाल आला आहे, असं अजित पवार म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “महाविकास आघाडीतील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो असतो तर वेगळा निर्णय आला असता. पण चारही पक्ष वेगवेगळे लढून काय आकडा आहे तुम्ही पाहू शकतो. तिघे पक्ष एकत्र लढले असते, तर संख्या वेगळी पाहायला मिळाली असती, आताही तुम्ही नगरपंचायत निवडणुकीत जे नगराध्यक्ष निवडून आलेत, त्यांच्या तिन्ही पक्षांची बेरीज केल्यास आकडा चांगला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे प्रकरणावरून सुरू असलेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली. “मला अमोल कोल्हेंचा फोन आला होता. २०१९च्या निवडणुकीआधी अमोल कोल्हेंसोबत मीच चर्चा करुन त्यांना शरद पवारांकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. मी कलाक्षेत्रात पहिल्यापासून काम करत आहे असे अमोल कोल्हेंनी सांगितले होते. २०१७ ला एखाद्या कलावंताने कुठल्याही पक्षासोबत संबंध नसताना करार केलेला असेल तर अनेकांच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्या आहेत. २०१९ मध्ये एका पक्षाचे सदस्य झाल्यानंतरची भूमिका त्यांनी लोकांच्या समोर ठेवली आहे,” असे अजित पवार म्हणाले.
याशिवाय पालकमंत्री अजित पवार आमदारांना भेटत नाही, असा आरोप भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, “तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा सर्वात जास्त भेटणारे अजित पवार आहेत. आज पावणेसात वाजताच कार्यक्रमासाठी आलो होतो उजाडले पण नव्हते. काही लोक वेगळ्या चष्म्याने बघतात त्याबद्दल काय बोलणार? ती मोठी माणसे आहेत आणि आम्ही लहान आहोत,” असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला.