मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभा आणि कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंगाचा वापर प्राध्यान्याने केला जातो आहे. अजित पवारदेखील सातत्याने गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करताना दिसून येत आहेत. यावरून आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या गुलाबी कॅम्पेनवर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान, या ‘पिंक पॉलिटिक्स’वर आता अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना त्यांच्या गुलाबी जॅकेटबाबतही विचारण्यात आलं. मात्र, यासंदर्भात बोलताना त्यांनी थेट माध्यमांच्या प्रतिनिधींनाच सुनावलं. मी माझ्या सद्सदविवेक बुद्धीनुसार कपडे घालतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा- अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा रंग ‘गुलाबी’

नेमकं काय म्हणजे अजित पवार?

मी गुलाबी रंगाचे जॅकेट घातला तर तुम्हाला काही त्रास होतो का? मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी माझ्या पैशाने कपडे खरेदी करतो. जे सर्वसाधारण लोक घालतात, त्याच प्रकारचे कपडे मी घालतो, असं अजित पवार म्हणाले. तसेच माझ्या सदसदविवेक बुद्धीनुसार जे पटतं ते कपडे मी घालते. मी ऑड डार्क असं काही घालत नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. पुढे बोलताना, तुम्ही कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय त्यावर मी काही बोललो का? असा प्रश्नही त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला.

अजित पवार गटाकडून सातत्याने गुलाबी रंगाचा वापर

अजित पवार यापूर्वी अनेकदा गुबाली रंगांचे जॅकेट परिधान करताना दिसून आले आहेत. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळीसुद्धा त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातलं होतं. तसेच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सिद्धीविनायकांचे दर्शन घेतलं, तेव्हाही त्यांच्या गळात गुबाली रंगाचे उपरणं दिसून आलं. याशिवाय बारामतीत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमादरम्यानदेखील व्यासपीठापासून तर सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला होता.

हेही वाचा – ‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अमोल कोल्हेंनी केली होती अजित पवारांवर टीका

दरम्यान, अजित पवार गटांच्या गुलाबी कॅम्पेनवर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली. शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी यावरून अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. “अजित पवार गुलाबी रंगाचे जॅकेट घालतात. यामागे राज्याचं वातावरण गुलाबी करण्याचा त्यांचा मानस असू शकतो. पण तसं होईल असं वाटत नाही, जॅकेट घालून राजकारण होत नाही” असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला होता.