लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असून अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या टीकेवर आता अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे.
अजित पवार यांनी आज पुण्यात आषाढी एकादशी संदर्भात नियोजन बैठक घेतली. याबैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संघाच्या मुखपत्रातील टीकेबाबतही प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना, मला यासंदर्भात जास्त काहीही बोलायचं नसून लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
हेही वाचा – “संजय राऊत ‘सिल्वर ओक’चे सुपारीबाज नेते, ते दिल्लीतील हॉटेलमध्ये बसून…”; राज ठाकरेंवर…
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“मला यासंदर्भात काहीही बोलायचं नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपलं मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार मी करतो आहे. त्यानुसार येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे”, असं अजित पवार म्हणाले.
भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवरही दिली प्रतिक्रिया
पुढे बोलताना त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “हे पूर्णपणे खोटं आहे. भुजबळ नाराज नाहीत, हे त्यांनी काल सांगितलं आहे. तरीही काही जण अशाप्रकारे बातम्या पसरवण्याचं काम करत आहे. यात कोणतेही तथ्य नाही”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “छगन भुजबळांना नेमकं काय हवंय ते देऊन टाका”, शिंदे गटातील नेत्याची संतप्त प्रतिक्रिया…
ऑर्गनायझरमध्ये नेमकी काय टीका करण्यात आली?
दरम्यान, ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे, असं त्यांनी या लेखात म्हटलं होते.
याशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याची टीकाही या लेखातून करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, असंही रतन शारदा यांनी म्हटलं होतं.