पुणे : प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असतानाच या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बळ दिले. सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या उमेदवार असतील, याचे स्पष्ट संकेत देतानाच ‘योग्य’ उमेदवार दिला जाईल. त्याला निवडून आणा. तुमच्या भागाचा सर्वांगिण विकास केला जाईल, याची खात्री देतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> उन्हाळ्यात दूध दरवाढीचे काय होणार?
आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने ‘आरोग्यसाथी’ पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रस्ताविकात आप्पा रेणुसे यांनी काही मागण्या केल्या. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास या मतदारसंघात येत असलेल्या आंबेगाव मधून मोठे मताधिक्य दिले जाईल. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. हा धागा पकडून अजित पवार यांनी सुनेत्रा यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
हेही वाचा >>> केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राजीनामा का दिला हे समोर आले पाहिजे; जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसात जागा वाटप निश्चित होईल. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मिळणाऱ्या जागांवरील उमेदवार जाहीर करतील. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल. कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागांवर योग्य उमेदवार दिला जाईल, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, निरोगी आयुष्यासाठी आचार, आहार आणि विचार आवश्यक आहेत. मात्र काही लोक विचार न करता सकाळी नऊ वाजल्यापासूनच अविचारीपणा दाखवितात. राजकीय प्रगल्भता न दाखविता अनेकांना प्राण्यांच्या उपमा देतात, अशा शब्दात पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली.