भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढवेन, अशा आशयाचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार यांनी आज टीव्ही ९ या वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुणे लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केलं. आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोट निवडणूक लढवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेन, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – ‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती? मनसे अध्यक्षांचं जुनं भाषण व्हायरल
अजित पवारांनी वडेट्टीवारांनी सुनावलं
दरम्यान, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना चांगलंच सुनावणं आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाली आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – “…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”, सुप्रिया सुळेंनी टोचले शिंदे-फडणवीस सरकारचे कान
संभाजीनगरमधील राड्यावरही केलं भाष्य
यावेळी बोलताना त्यांनी संभाजीनगरमधील राड्यावरही प्रतिक्रिया दिली. संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. माझं संभाजीनगरमधील नागरिकांना सांगणं आहे, की कोणी जर तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असले, तर त्याला थारा देऊ नका, असं ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबरोबरच सभेदरम्यान संभाजीनगरमधील वातावरण बिघडेल, असं विधान कोणी करू नये, असे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं.