लोकसत्ता वार्ताहर
बारामती : बारामतीत एका कार्यकर्त्यांनी निवेदन देत सांगितले की, एक नोंद लावण्यासाठी अधिकाऱ्याने मला पंधरा हजाराची मागणी केली, अशी माहिती सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, यांना पगार आणि सुविधा पुरत नाहीत का असं सवाल त्यांनी व्यक्त केला.
सातव्या वेतन आयोगाचा पगार मिळतो आहे, आता आठवा वेतनही दिला जाईल, सर्व आवश्यक सुविधा दिल्या जातात, असे असतानाही सुद्धा बारामती मध्ये सरकारी अधिकारी व कर्मचारी कामासाठी पैश्याची मागणी करतात, हे आता सोकावले असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा लोकांचा बंदोबस्त करायला पाहिजे, असा स्पष्ट इशारा राज्याचे अजित पवार यांनी दिला.
शुक्रवार ( तारीख २८ मार्च ) रोजी बारामतीतील डॉक्टर विशाल व डॉक्टर निकिता मेहता यांच्या मेहता रुग्णालयातील अपेक्स डायलेसिस सेंटर, जॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सेंटर चे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले, या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार बोलत असताना त्यांनी वरील इशारा दिला. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले,” बारामतीत एका कार्यक्रमात मला एका कार्यकर्त्यांनी आज निवेदन दिले, आणि निवेदन देताना सांगितले की एक नोंद करण्यासाठी माझ्याकडून १५ हजारांची मागणी केली आहे, या बाबत मनापासून नाराजी व्यक्त करीत अजित पवार म्हणाले, काय सुरू आहे बारामती ?
पगार आणि सुविधा यांना पुरत नाहीत का ? या बाबत आज संध्याकाळी संबंधित त्याला बोलवून घेतो, बारामती विभागाची उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तुम्ही ही संध्याकाळी या, आपण त्याच्याकडे चौकशी करू, कोणीही कोणाच्याही वशिलाने बारामतीत आला असेल तरी मी हे खपूनच घेणार नाही, त्यात लक्ष घालून त्याला मी सरळ केल्या शिवाय आता मला दुसरा मार्ग नाही…
कार्यकर्ते पण काम निघाले की कंत्राट मागतात, यापुढे ज्यांना कंत्राटदार व्हायचे आहे, त्यांनी पुढारी व्हायचे नाही, आणि पुढार्यांनी कंत्राटदारांची कामे करायची नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. विकासाची कामे करताना बारामतीकारांनी चांगली नैतिक जबाबदारी लक्षात घेत व्यवस्थित पद्धतीने राहिला हवे, असे मत श्री. अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
अजित पवार पुढे म्हणाले, “मी ज्याच्याकडे कार्यक्रमासाठी जातो त्याचे विचारही लोक ऐकून घेत नाही, सतत कागद समोर करत राहतात, माझ्यासोबत माझ्या स्वीय सहायक असतात त्यांच्याकडे सुद्धा कागद देत नाहीत , सर्व कागद अजितदादां कडेच देतात, स्वीय सहाय्यक त्यांच्या कडे कागद दिला तर काय अक्षर पुसले जाणार आहे का ? स्वीय सहायक मला माझी कागदपत्रे आणून देतात, मी ही आता गेली पस्तीस वर्षे काम करतो आहे, राज्याची पण जबाबदारी आता माझ्याकडे आली आहे, वाढणारा व्याप बघूनच कामे करावी लागतात, मात्र तरीही लोक ऐकत नाहीत, मतदानाच्या वेळी बटन दाबतात म्हणजे…!
कधीतरी असं वाटतं मी दुसऱ्याला आमदार करू शकतो विधान परिषदेवर न हात जोडता विधान परिषदेचा आमदार इथे आला म्हणजे तुम्हाला समजेल ते कसं असतं ते…! असे सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
धर्मदाय रुग्णालयात राज्यात कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती एका क्लिकवर समजेल,अशी व्यवस्था आता मंत्रालय स्तरावर करण्यात आली आहे, याबाबत एक नवीन कायदा नुकताच झालेल्या अधिवेशनात संमत केला असून रुग्णांना या रुग्णालयात उपचार कसे मिळतील याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले, ” सध्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे , त्यातही महिलांमधील वाढता कर्करोग फार चिंताजनक बनला आहे, त्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्ष वयोगटातील सर्व मुलींना आदर पूनावाला यांनी विकसित केलेली लस विनामूल्य दिली जाईल. कर्करोगावर मात करण्यासाठी अदर पूनावाला यांनी एक लस विकसित केली असून ती लस मुलींना विनामूल्य देण्याचा कार्यक्रम पण आपण सर्वजण मिळून हाती घेणार आहोत, असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.