पुणे : शुक्रवारी दुपारपासून जवळपास १८ तास विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संपर्क होत नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना उधाण आले होते. अजित पवार यांचे शुक्रवारी पुण्यात नियोजित तीन कार्यक्रम होते. पण,अचानक दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले. त्याबाबतचे कारण समोर न आल्याने अजित पवार हे नेमके कुठे गेले? हे कोणाला समजले नाही. त्यानंतर शनिवारचेही सर्व कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबरोबर पुण्यातील खराडी भागातील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. संपर्क होत नसल्याच्या बातम्यांनी मी व्यथित झालो, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील एका कार्यक्रमात आणि नंतरही पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, कार्यक्रमाला निघताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरण जास्त झाले, दौरे झाले की मला पित्ताचा त्रास होतो. यापूर्वीही असा त्रास झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन गोळय़ा घेतल्या आणि झोपलो. शनिवारी सकाळपासून कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही मर्यादा असते. माध्यमांत माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो.

निवडणूक जाहीर झाल्यावर ठरवू

निवडणूक आयोगाने अद्याप पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे योग्य नाही. रितसर घोषणा झाल्यावर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा झालीच नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिले आहेत. कमी वेळ शिल्लक असतानाही यापूर्वीही निवडणुका झाल्या आहेत.

नवे प्रश्न निर्माण करू नयेत आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले. त्या महापुरुषांचा उल्लेख करताना त्यांच्याबद्दल आदरच दाखवला पाहिजे. ती आपली संस्कृती आणि परंपरा आहे. त्यातून कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही. महापुरुष म्हणून त्यांनी केलेले काम गौरवास्पद आहे. त्यातून नवे प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar regret on the news of non contact pune amy
Show comments