पुण्यातल्या अल्पवयीन गर्भश्रीमंत मुलाने पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली होती. त्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. तसेच या प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. दरम्यान, या मागणीवर आता अजित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “यावेळी काय होणार? हे ब्रह्मदेवही…”
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना अंजली दमानियांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना “मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. मात्र, नार्को टेस्टमध्ये जर मी निर्दोष आढळलो, तर तिने (अंजली दमानियांनी) पुन्हा माध्यमापुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा”, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं.
अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या होत्या?
दरम्यान, पुण्यातील अपघातावर बोलताना अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. तसेच याप्रकरणी त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. “याप्रकरणी काही पत्रकारांच्या पोस्ट मी पाहिल्या, वाचल्या. अजित पवारांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन केल्याचं काही जण म्हणत आहेत. हीच शंका माझ्याही मनात होती. कारण सुरुवातीचे चार दिवस अजित पवार काहीच बोलले नाहीत. मी रोज सकाळी उठून काम करतो वगैरे म्हणणारे अजित पवार अपघाताबाबत गप्प होते. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेचं नाव पुढे येत होतं. ही सगळी सारवासारव कुणासाठी चालली होती?” असे त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा – महायुतीत मिठाचा खडा? भुजबळांनी राष्ट्रवादीसाठी विधानसभेच्या ९० जागा मागितल्यानंतर भाजपाचा इशारा, म्हणाले…
अजित पवारांच्या नार्को टेस्टची केली होती मागणी :
पुढे बोलताना, “याप्रकरणी अजित पवार धादांत खोट बोलत आहेत. अजित पवारांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे अजित पवारांचा फोन जप्त करायला हवा आणि त्यांची नार्को टेस्ट करायला हवी”, असंही अंजली दमानियांनी म्हटलं होतं.