उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं. यावर पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना दिगंबर दुर्गाडे म्हणाले, “गेली ३२ वर्षे अजित पवार जिल्हा सहकारी बँकेत काम करत होते. यादरम्यान आशिया खंडातील एक नंबर बँक म्हणून नावारूपास आली. पण, उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा कारभार वाढला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेसाठी वेळ आणि उपमुख्यमंत्रीपदाला न्याय देण्यासाठी अजित पवारांनी सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. मात्र, अजित पवार दर महिन्याला बँकेचा आढावा घेणार आहेत.”
हेही वाचा : “सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का?” राहुल गांधींना लक्ष्य करत आठवलेंचा सवाल
राष्ट्रवादीतील घडामोडींचा राजीनामा देण्याशी संबंध आहे का? असा प्रश्न विचारल्यावर दिगंबर दुर्गाडेंनी म्हटलं, “याचा काही संबंध नाही. ‘मला वेळ देता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीत उभं राहायचं नाही,’ असं अजित पवारांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सांगितलं होतं. पण, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अजित पवार उभे राहिले होते. मात्र, आता वेळ देता येत नसल्यानं राजीनामा दिला आहे.”
हेही वाचा : “राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करा”, सदावर्तेंच्या मागणीवर मनसे नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…
“अजित पवारांमुळे जिल्हा बँक देशात एक नंबर बनली आहे. त्यामुळे अजित पवारांचं मार्गदर्शन सदैव जिल्हा बँकेला राहणार आहे,” असं दुर्गाडेंनी सांगितलं. दरम्यान, अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं संचालकपदाची एक जागा रिक्त झाली आहे. त्याजागी कुणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.