पुणे / बारामती : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आले. मात्र, त्यावेळी आम्ही ‘इलेक्ट्राॅनिक्स व्होटिंग मशिन’ला (मतदान यंत्र- ईव्हीएम) दोष देत बसलो नाही. निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधली आणि जोमाने कामाला लागलो. सर्व घटकांसाठी विविध योजना आणल्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी टीका करण्याऐवजी योजनांची माहिती दिली, अशा शब्दात मतदान यंत्रांवरील विरोधकांकडून घेण्यात येत असलेल्या आक्षेपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर कौल देईल, असे वाटले नव्हते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

बारामती मतदारसंघातून सलग आठव्यांदा विजयी तसेच राज्याचे सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा बारामती शहरात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमोल मिटकरी, राज्यसभेच्या खासदार, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, शहराध्यक्ष जय पाटील उपस्थित होते.

हेही वाचा…थंडीचा कडाका सरला, आता हलक्या पावसाची चिन्हे

‘लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही सर्व चिंतेमध्ये होतो. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत राज्याने महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल दिला. महायुतीची लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली. जे बोलतो तेच करून दाखवतो. महायुतीचा विजय महाविकास आघाडीला सहन झाला नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर आक्षेप घेण्यास सुरुवात झाली,’ असे अजित पवार यांनी सांगितले. ‘बारामतीकरांनी एक लाखाच्या मताधिक्याने विजय करून जबाबदारी वाढविली आहे. ही जाबाबदीर मोठी असली तरी, ती समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करेन. अर्थ खाते असल्याने राज्यातील जनतेचा विचार करून अर्थसंकल्प मांडला जाईल. राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्यांमधील सध्या अनेक विमानतळावर नाईट लँडिंग साठी विमानांची गैरसोय होत आहे, त्यामुळे येत्या काळात बारामती, लातूर, यवतमाळ येथे विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…पुणे पुस्तक महोत्सवात यंदा पुस्तक विक्रीत चौपटीने वाढ; किती झाली उलाढाल?

धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह

बारामतीमधील धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली. नागपूर येथील विधीमंडळाचे अधिवेशन आणि मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर अजित पवार यांनी रविवारी पहाटे बारामतीमधील विकासकामांची पाहणी केली. मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठान येथील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र (एआय सेंटर) तसेच श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

Story img Loader