छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या भूमिकेवर ठाम आहे. मी केलेले विधान कोणाला द्रोह वाटत असेल तर गुन्हा दाखल करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे शुक्रवारी दिले. माझी प्रत्येक भूमिका सर्वांना पटेल असे नाही. माझी भूमिका चुकीची ठरणारे हे कोण ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “…तेव्हापासून मी संसदेत जायला घाबरतो”; शरद पवारांनी सांगितलं कारण, PM मोदींच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख करत म्हणाले…

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणे योग्य आहे, असे विधान अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केले होते. त्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलने केली होती. संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे, हा द्रोह आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर भूमिकेशी ठाम असल्याचा पुनरूच्चार करतानाच द्रोह असेल तर गुन्हा दाखल करा, असे आव्हान अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- शेतजमीन, वहिवाटीचे वाद मिटवा केवळ दोन हजार रुपयांत, शासनाची सलोखा योजना

मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचार स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी जी भूमिका मांडली ते सर्वांच पटेल, असे नाही. मात्र, माझी भूमिका चुकीची आहे, हे ठरविणारे तुम्ही कोण, असे अजित पवार यांनी सांगितले. मी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. मात्र मी कोणता गुन्हा केला आहे. अपशब्दही वापरलेला नाही. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्य केले. अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले. जीवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसे घडणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे: अजित पवारांविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक; दुचाकींना लावले ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ आशयाचे स्टीकर

भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही आक्रमक होण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल केला असता अजित पवार यांनी थेट पक्षाचीच भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. पहिल्यापासून आम्ही पुरोगामी विचार मानणारेच आहोत. महापुरुष आणि वडीलधाऱ्यांनी जी शिस्त घालून दिली. विचाराचा पगडा आहे त्याला धक्का न लागता पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा- ‘शरद पवारांच्या तालमीत तयार झालोय’ असं सुशीलकुमार शिंदे म्हणताच शरद पवार म्हणाले “मला भीती वाटतेय…”

जल्लोषात स्वागत

हिवाळी अधिवेशन आक्रमकपणे गाजवल्यानंतर टीका -टिप्पणी आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पवार पहिल्यांदा पुण्यात आल्यानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणारे स्टिकर्स वाहनांवर लावण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar said about his statement about chhatrapati sambhaji maharaj and agitation over his statement pune print news apk13 dpj