पुणे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून सुरू झालेले निषेध आंदोलन, तसेच धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी अहमनदनगरचे अहल्यानगर असे नामांतर करण्याचा घाट घालण्यात आल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य कालातीत आहे. नामांतराच्या प्रस्ताव आल्यास एक राजकीय व्यक्ती म्हणून आम्ही स्वागत करतो. किंबहुना हीच भूमिका असली पाहिजे.
हेही वाचा >>> ‘शिरूर’ मध्ये अनेक इच्छुक…अजित पवार म्हणाले, ‘मग बिघडले कुठे?’
मात्र, सद्यस्थितीत अहमदनगरचे नामांतर व्हावे यासाठी कोणतेही आंदोलन पेटलेले नव्हते. अशा प्रकारची मागणीही करण्यात आली नव्हती. मात्र, सध्याच्या सरकारमधील काहींनी महापुरूषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य केली. त्यात वाचाळवीरांची आणखी भर पडली. यापूर्वी सत्तेत असताना सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. तो पूर्णत्वास न गेल्याने भाजप-शिवसेना युती सरकारने नामांतरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. नागरिकांचे लक्ष वळविण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका पवार यांनी केली.
अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव मिळाल्याचे स्वागत करतो. महापुरूषांच्या नावे शहर ओळखले जावे यामध्ये कोणतेही दुमत नाही. महापुरूषांचे स्मरण, तसेच त्यांच्या विचाराचा प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र, असे करत असताना राजकीय स्वार्थ डोळ्यासमाेर ठेवू नये, असे त्यांनी नमूद केले. शिवराज्याभिषेक, शिवजयंती आदी महत्त्वाचे कार्यक्रम प्रत्येकजण तिथी किंवा दिनांकानुसार करू शकतात. सरकारने शिवराज्याभिषेक सोहळा तिथी तसेच दिनांकानुसार साजरा करत आहे. काही वर्षांपासून सरकार दिनांकानुसार शिवराज्यभिषेक, शिवजयंती सोहळा साजरी करत आहे.
हेही वाचा >>> पुणे पाठोपाठ आता ‘मावळ’ही आमचे!, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…
मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीत तज्ज्ञ सामूहिक संपावर गेले असल्याने रुग्णांचे हाल सुरू आहे. रुग्णालयाच्या विविध अडचणी असतात. चर्चा करून मार्ग काढण्याची आवश्यकता असून ते करण्यास सरकार कमी पडत असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर असून वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. सत्ताधाऱ्यांनी विधानसभेतही लव जिहादचा मुद्दा मांडला. मात्र, प्रत्यक्षात असे प्रकार अत्यंत कमी घडल्याचे दिसून आले. एकमेकांचा धर्म, जातींबद्दल आदर ठेवावा. तेढ, दुही, द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य कोणी करू नये, असे त्यांनी सांगितले.