पिंपरी : ‘मुख्यमंत्री वर्षा निवास्थानी कधी राहायला जाणार, याच्याशी काही घेणेदेणे आहे का, ताे बंगला पाडून नवीन बांधणार असे काहीही सांगितले जाते. मुख्यमंत्र्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा आहे. ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावे लागते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीची दहावीची परीक्षा झाल्यावर मुख्यमंत्री वर्षावर राहण्यास जाणार आहेत. सकाळी भोंगा वाजताे. शिंग पूरल्याचे दाखविले जाते. ‘टीआरपी’साठी वर्षा बंगल्याचा वापर कशाला करता. यामध्ये राज्याचे हित नाही’, असे सांगून अजित पवार म्हणाले, ‘पाेलिसांना काेणत्याही सुविधा कमी पडू दिल्या नाहीत.
जे पाहिजे ते दिले जात असतानाही पुण्यातील बिबवेवाडीत २५, येरवड्यात १५ वाहनांची ताेडफाेड केली जाते, असे का हाेत आहे. अधिका-यांना संपूर्ण मुभा देऊनही गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगून अजित पवार यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पोलिसांचे वाभाडे काढले. येथे पुणे पाेलीस आयुक्त अमितेश कुमार हजर असणे आवश्यक हाेते, त्यांना ऐकविले असेही ते म्हणाले.
‘पाेलीस कारवायांमध्ये आमचा कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. पाच फेब्रुवारीला बिबवेवाडीत २५ तर सहा फेब्रुवारीला येरवड्यात १५ वाहनांची ताेडफाेड झाली. असे का हाेत आहे. शहराला कळेल, अशी आराेपींची धिंड काढावी, काेण माेठ्या आणि छाेट्या बापाचा नाही, कायदा सर्वांत श्रेष्ठ आहे. काेणता काेयता आणि काेणती गॅंग काढली जाते. त्यांचा बंदाेबस्त करावा. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करावी. पाेलिसांना काेणत्याही सुविधा कमी पडू दिल्या जात नाहीत. जे पाहिजे ते राज्य सरकारकडून दिले जात आहे. त्यामुळे काेणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी वाढता कामा नये. काेणी चुकीचे वागू नये, अनधिकृत कामाकडे दुर्लक्ष करा, असे काेणी सांगू नका’, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढता कामा नये, अन्यथा पोलीस मुख्यालयासह सर्व कामे बंद केली जातील. कायदा सुवस्था चांगली राहत नसेल तर कशाला पाहिजे, चांगली इमारत’, असा सज्जड दमही पवार यांनी दिला.