विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवड येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरही भाष्य केले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे करतील, असे सांगितले होते. मग बाकीच्यांचा काय संबंध, असे म्हणत शिंदे गटावर टीका केली. तसेच आगामी निवडणुकीत शिंदे गटातील सर्व उमेदवार पराभूत होतील, असा दावाही अजित पवार यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अदाणी समूह प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्ला; लोकसभा सचिवालयाची राहुल गांधींना नोटीस

बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले

“शिवसेना कोणी काढली हे सर्वांनाच माहिती आहे. जे गेले त्यांचा शिवसेना उभी करण्यात नखाचाही वाटा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिल्यामुळे ते निवडून आले. आम्हीही ते पाहिलेले आहे. पानटपरीवाले, वाहनं चालवणारी साधी-साधी माणसं खासदार, आमदार झाले. हे सगळं बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शक्य झाले,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> “संजय राऊत हे जगातील आठवे अजुबे”; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला; म्हणाले, “ते तर…”

तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की…

“आता माझे वय झालेले आहे. इथून पुढे शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हेच सांभालतील असे बाळासाहेब ठाकरेंना शिवाजी पार्कवरील सभेत सांगितले होते. मीही ती सभा टीव्हीवर पाहात होतो. या सभेला युवानेते म्हणून आदित्य ठाकरे त्या सभेत मंचावर आले होते. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की युवानेते म्हणून आदित्य ठाकरे काम करतील,” अशी आठवणही अजित पवार यांनी सांगितली. तसेच बाळासाहेबांनी सांगितलेले असताना सटर फटरवाले मध्येच काय करत आहेत. उद्या निवडणुका लागुद्या. त्यांची काय अवस्था होईल ते समजेल, असा टोलादेखील अजित पवार यांनी शिंदे गटाला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar said eknath shinde and rebel mla group will lose upcoming elections prd