राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि खोचक टोल्यांसाठी ओळखले जातात. ते पुणे दौऱ्यावर असताना असाच अनुभव एका कार्यकर्त्याला आला. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने आपली नवी बुलेट अजित पवार यांना दाखवली. यानंतर अजित पवारांनी बुलेट पाहिली आणि बुलेटला एकच सीट पाहून टोलेबाजी केली.
बुलेट पाहिल्यावर सुरुवातीला अजित पवारांनी या गाडीला एकच सीट आहे का असं विचारलं. यावर कार्यकर्त्याने ‘हो एकच सीट आहे’, असं उत्तर दिलं. यानंतर अजित पवारांनी मैत्रिणीला न्यायचं असेल तर? असा प्रश्न विचारला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
व्हिडीओ पाहा :
नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता आपली नवी जावा बुलेट घेऊन अजित पवारांना दाखवायला आला. त्याने अजित पवारांना गाडीवर बसण्याचा आग्रह धरला. त्यावर अजित पवारांनी मला काहीही करायला लावतो आहेस, असं म्हणत बुलेटवर बसणं टाळलं. त्यानंतर कार्यकर्त्याने अजित पवारांच्या हस्ते बुलेटला चावी लावली आणि गाडीवर बसण्याचा आग्रह सुरूच ठेवला. फक्त बुलेटवर बसा, चालवू नका, असाही आग्रह केला. मात्र, अजित पवारांनी नको म्हणत बुलेटवर बसण्यास नकार दिला.
यानंतर अजित पवारांनी या बुलेटची किंमत विचारली, तसेच किती एचपीची बुलेट आहे अशीही चौकशी केली. कार्यकर्त्याने जावा बुलेट असल्याचं सांगितल्यानंतर अजित पवारांनी पूर्वीची जावा कंपनी तीच आहे का असं विचारलं. तसेच जावा आणि बुलेटच्या एचपीत आणि किमतीत किती फरक आहे याची माहिती घेतली. यानंतर अजित पवारांनी या गाडीला एकच सीट आहे का असं विचारलं. यावर कार्यकर्त्याने ‘हो एकच सीट आहे’, असं उत्तर दिलं. यानंतर अजित पवारांनी मैत्रिणीला न्यायचं असेल तर? असा प्रश्न विचारला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.