पुणे : ‘महाराष्ट्राच्या राजकारणाला साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विरोधी पक्षनेते असताना ‘अर्थसंकल्प समजून घेताना’ हे पुस्तक लिहिले होते. आता मुंबईत गेल्यावर ‘मी पुन्हा येईन’ हे आणखी एक पुस्तक लिहिण्याचा सल्ला मी देवेंद्रजींना देणार आहे,’ अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

‘लोकसंवाद प्रकाशन’च्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या ‘ऐकलंत का?’ या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. क्रीडा राज्यमंत्री दत्ता भरणे, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, आमदार शंकर मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार दिलीप मोहिते, रमेश ढमाले, चंद्रकात मोकाटे, अतुल बेनके, रमेश थोरात, दत्ता घुले या वेळी व्यासपीठावर होते. पवार म्हणाले, ‘आपल्या राज्याला राजकारणाचा सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे लाभला आहे. तो टिकवला पाहिजे अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दोघांच्या भूमिका या वेगवेगळ्या असल्या, तरी आपलेपणा, ओलावा आणि जवळीक असायची. अलीकडे हे चित्र फार कमी पाहायला मिळते. राजकारण हे सेवा करण्याचे एक माध्यम आणि समाज परिवर्तनाचे साधन आहे, हे सूत्र मानून राजकारणात प्रवेश करणारे फार कमी लोक राहिले आहेत.’

‘या लेखनाद्वारे सुनील चांदेरे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा आलेख मांडला आहे. या पुस्तकात माझ्यावर बेतलेले काही प्रसंगदेखील मांडण्यात आले असून, माझ्या राजकीय जीवनाचा प्रारंभीचा काळ, भाषण करताना धडधडणारी माझी छाती आणि लटपटणारे पाय या सगळ्या गोष्टी हे पुस्तक वाचताना मला पुन्हा एकदा आठवल्या. ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व असले म्हणजे तुमचे भाषण चांगले होते, असे नाही. तर ज्या व्यक्तीविषयी आपण बोलत असतो, त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात कणव, तळमळ, प्रेम आणि आपलेपणा असेल, तरच ते भाषण भावस्पर्शी आणि मनाचा ठाव घेणारे होते,’ असेही पवार यांनी सांगितले. फुटाणे आणि चांदेरे यांनी मनोगत व्यक्त केले. दुर्गाडे यांनी प्रास्ताविक केले. चित्रा खरे यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक म्हणून माझ्या जीवनाची सुरुवात झाली. या बँकेने मला राज्य सहकारी बँकेवर पाठवले आणि तेथून मी राजकारणात सक्रिय झालो. कामाचा व्याप वाढल्यामुळे मी संचालकपदाचा राजीनामा दिला. पण, दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे हे बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने पाहत आहेत.अजित पवार, उपमुख्यमंत्री