महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या विदर्भ दौऱ्यावरुन तसेच नियोजित कोकण दौऱ्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे अनेकदा एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांपैकी अजित पवार यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे राज यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं. अजित पवार यांनी दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण आधी पाहणार, अब्दुल सत्तार यांनी डायनासॉर म्हणत केलेली टीका यासारख्या प्रश्नांनाही उत्तरं दिली.
नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची?
अजित पवार यांना राज यांच्या दौऱ्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना विरोधीपक्ष नेत्यांनी दौरे काढणं हा राज यांचा अधिकार असल्याचं म्हटलं. “राज ठाकरे यांनी दौरे काढले तर तुम्हाला काय त्रास होतो? प्रत्येक पक्षाच्या नेत्याला राज्यात दौरे काढण्याचा अधिकार आहे. मतदारांना ज्याची भूमिका पटेल, त्याच्या पाठिशी लोक उभे राहतील,” असे अजित पवार यांनी राज यांच्या विदर्भ दौरा आणि प्रस्तावित कोकण दौऱ्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना भाष्य केले.
नक्की वाचा >> ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”
‘शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची, तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दसऱ्याच्या दिवशी सभा होणार असून या दोघांची भाषणे एकाचवेळी सुरू झाली, तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचे भाषणे ऐकेन. त्यानंतर दूरचित्रवाणीवरून पुन:प्रसारित होणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार आहे’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. शिवसेना आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भाषणे एकाचेवळी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, शिवसेनेबरोबर असलेले ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यत जपेल. मोठमोठे राजकीय मेळावे केले जातात, तेव्हा कार्यकर्त्यांना बोलावले जाते. दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा मोठा? यावरुन ईर्षा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करुन दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
नक्की वाचा >> “पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान
महाविकास आघाडीमध्ये डोके खाणारा डायनासॉर होता, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते. त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यालाही अजित पवार यांनी उत्तर दिले. फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही. बेरोजगारी, महागाईचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. बेरोजगारी वाढली, वेदान्तसारखा प्रकल्प गेला. दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. त्याविषयी त्यांनी बोलावे, असे अजित पवार म्हणाले.