महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली व अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा रखडलेला निर्णय यामुळे पिंपरी-चिंचवडचे वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी (२६) शहरात दौरा असल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
भोसरी व निगडी येथील महापालिकेचे ‘ई’ व ‘फ’ या नवीन क्षेत्रीय कार्यालयांचे उद्घाटन तसेच चिंचवडला ‘नागरिकांची सनद’ या पुस्तिकेच्या प्रकाशनासह अजितदादांच्या उपस्थितीत रविवारी पालिकेने काही कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. आयुक्तांच्या संभाव्य बदलीवरून विरोधी पक्षांनी रान पेटवले असून सर्वसामान्य नागरिकही आयुक्तांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येऊ लागला आहे. आयुक्त शनिवापर्यंत पाचगणी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. रविवारी होणारे कार्यक्रम आयुक्तांचे पिंपरीतील शेवटचे कार्यक्रम असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येते. यासंदर्भात, आयुक्त कोणतेही भाष्य करत नसले, तरी सत्ताधारी नेते मात्र छातीठोकपणे आयुक्तांची बदली झाल्याचे सांगत आहेत. अनधिकृत बांधकामे २० जानेवारीपर्यंत नियमित होईल, अशी घोषणा अजितदादांनी केली होती. प्रत्यक्षात अजूनही ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. या दोन्ही मुद्दय़ांवरून राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची आक्रमक खेळी विरोधक करत आहेत. अशा परिस्थितीत, अजितदादा शहरात येत असल्याने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दौऱ्यात पवार नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा